बारामती येथील लियरजेट ४५ (व्हीटी-एसएसके) च्या अपघाताच्या तपासाबाबत विमान अपघात तपास संस्थेने दिली माहिती
मुंबई, दि. १७: बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या लियरजेट ४५ विमान व्हीटी-एसएसके च्या अपघाताची सविस्तर चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून ही चौकशी विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, २०१७ आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) परिशिष्ट १३ मधील आंतरराष्ट्रीय मानके आणि शिफारस केलेल्या पद्धतींनुसार काटेकोरपणे केली जात आहे.
या विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले.
एल3-कम्युनिकेशन्स यांनी तयार केलेला डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर, विमान अपघात तपास संस्थेच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला. तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सध्या विस्तृत तांत्रिक तपासणी सुरु आहे. डेटा पुनर्प्राप्तीसाठी विशेष तांत्रिक सहाय्य मिळविण्यासाठी उत्पादन करणाऱ्या देशाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागविण्यात आली आहे.
ही चौकशी समावेशी, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित व्हावी यासाठी विमान अपघात तपास संस्था सर्व विहित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. संपूर्ण पारदर्शकतेसाठी संस्थेची वचनबद्धता कायम असून चौकशी दरम्यान योग्य वेळी पुढील माहिती सामायिक केली जाईल.
विमान अपघात तपास संस्थेने सर्व संबंधित घटकांना कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत आणि प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी अशी विनंती केली आहे.
