सहकारी मंत्री, नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
बारामती, दि. २८: महाराष्ट्राची आजची सकाळ ही एका धक्कादायक व दुःखद बातमीने सुरू झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान बारामती येथे विमान अपघातात निधन झालं आहे. विमान धावपट्टीवर लँडिंग होण्याआधी विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. दुर्घटना घडल्यानंतर गंभीररीत्या जखमी उपमुख्यमंत्री अजित पवार व इतरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सगळे कुटुंबीय सध्या दिल्लीत असून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासह ते बारामतीकडे रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्र शोकाकुल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे सहकारी मंत्री हमसून हमसून रडताना पाहायला मिळाले. राज्यात सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री पदी राहिलेले अजित पवार हे उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. भल्या पहाटे दिवस सुरू करणारा नेता अशी ख्याती असलेले अजितदादा अधिकारी-कर्मचारी मंत्रालयात पोहोचण्याआधी त्यांच्या कार्यालयात हजर असत.
