राजकीय भूकंप! अजित पवार यांच्या सोबत आणखी 9 आमदारांनी घेतली मंत्री पदाची शपथ
मुंबई, दि. २: महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून अनेक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी आज रविवारी (२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, आदिती तटकरे, धर्मराव अत्राम आणि धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत राजभवनात गेलेले काही आमदार शरद पवार यांच्या पाटण्यातील विरोधी एकता बैठकीत राहुल गांधींसोबत सहकार्य करण्याच्या “एकतर्फी” निर्णयावर नाराज होते.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते आज पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. हे समीकरण महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी बसले आहे. हे समीकरण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आज राष्ट्रवादीचे अनेक आमदार सामील झाले आहेत.
मंत्रिमंडळात सामील झालेल्या आमदारांची यादी
अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री
