राज्यात मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने जनहिताचे आणि अत्यावश्यक निर्णय घ्यायला उशीर होत असल्याची अजित पवार यांची टीका
मुंबई, दि. २ : राज्याच्या कारभाराचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे एकवटलेले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने जनतेच्या हिताचे आणि अत्यावश्यक असणारे निर्णयही घ्यायला उशीर होत आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पूरग्रस्त भागाचा दौरा करुन आल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूरग्रस्त भागातल्या शेतकरी आणि शेतमजूरांची हलाखीची स्थिती झाली असल्याचं सांगितलं. केंद्रीय पथकाकडून अद्याप पूरग्रस्त भागाची पहाणी झालेली नाही. फळबागांवर किड पडली आहे, सोया, तूर कापूस या पीकांचं भरून न येणारं नुकसान झालं आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी 75 हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तत्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 2, 2022
शेतकऱ्यांच्या पशूधनाचंही नुकसान झाल आहे. अश्या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्विकारत फिरत आहेत हे असंवेदनशीलतेचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवायला प्राधान्य द्यावं, त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं.
दुबार पेरणीचं संकट पुढे ठाकलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार आर्थिक सहाय्य करावं, विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी. शेतमजूर आणि शेतकऱ्यांनाही धान्याची मदत करावी अश्य़ा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. आपण या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
