आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, प्रॉम्प्ट इंजीनियरिंग Prompt Engineering मधल्या नोक-या आणि भाषा.. !
विशेष लेख(नीलांबरी जोशी): महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. एआयच्या जगात चॅटजीपीटी किंवा त्याप्रकारच्या कोणत्याही टूलबरोबर काम करण्यासाठी सर्वात आवश्यक असणारी क्षमता ही, भाषा उत्तम येणं आणि उत्तमपणे वापरता येणं ही आहे.
शिक्षण, आरोग्यसेवा, शेती, माध्यमं, साहित्यनिर्मिती किंवा कोणतीही कलानिर्मिती एआयकडून करुन घ्यायची असेल तर त्याला समजेल अशा अचूक भाषेत त्याला काम सांगायला हवं. एआयच्या जगात याला प्रॉम्प्ट देणं म्हणतात. उदाहरणार्थ, एखादं चित्र एआयनं काढायला हवं असेल तर त्याला चित्र का काढायचं आहे त्याचं कारण (पेंटिंग का पुस्तकाचं कव्हर वगैरे), रंगसंगती, पार्श्वभूमीचा रंग, त्यात मानव असेल तर त्याच्या देहबोलीतून काय प्रकट व्हायला हवं आहे, समजा तंबोरा घेऊन गाणारी स्त्री असेल तर तिच्या गळ्याचे स्नायू कसे दिसायला हवे आहेत, तसंच एकूणच चित्रात कशाप्रकारच्या भावना व्यक्त व्हायला हव्या आहेत, त्यावर जर टेक्स्ट हवं असेल तर त्याचा साईज, फॉंट, शैली, चित्रातली जागा अशा असंख्य गोष्टींचं prompting एआय टूलला करायला लागतं.
अचूक, नेमकी शब्दयोजना, कामाचा संदर्भ, भाषेत पूर्वग्रह उमटू न देणं, एआयनं ते काम स्वत: पूर्ण करावं का आपण सांगितलं तितकंच करावं अशी शब्दयोजना, दिलेल्या सूचनेप्रमाणे काम झालं नाही तर पुढच्या वेळी नक्की काय चुकलं याचा विचार करुन prompt बदलणं, अर्थपूर्ण कंटेंट तयार कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं इ. गोष्टी prompt देताना पहाव्या लागतात.
थोडक्यात त्या त्या क्षेत्राचं ज्ञान (domain knowledge) आणि भाषेचं उत्तम ज्ञान या दोन क्षमता मानवाकडे एआयबरोबर काम करताना अत्यावश्यक आहेत. एआयनं तयार केलेल्या कंटेंटचा दर्जा हा एआयला असलेल्या मर्यादा याबरोबरच मानवाकडे व्यक्त होण्यासाठी त्याला असलेल्या भाषेच्या आणि त्या विशिष्ट क्षेत्राच्या मर्यादा यावरही अवलंबून असतो/असणार आहे.
एआयच्या जगात नोक-या जाणार असा आरडाओरडा सुरु असताना prompt engineering या क्षेत्रात नोक-या प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. या नोक-या संशोधनापासून कलेच्या सर्व शाखांपर्यंत सर्व क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामांमध्ये उपलब्ध होत आहेत. एआयला prompt द्यायला शिकवणं हेदेखील एक प्रकारचं माणसाचं काम आहेच..! असं असताना आत्ता महाराष्ट्रात अनेक कारणांनी मुळात मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे लोक खूप कमी आहेत. (Domain knowledge चा अभाव हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) एकापेक्षा जास्त भाषा येणं याचा फायदा नक्कीच आहे. पण त्यासाठी आधी मातृभाषा पक्की असेल तर दुसरी / तिसरी भाषा येणं सोपं होतं.
मुलांच्या भवितव्याचा विचार करता आणि आपल्या देशानं एआयच्या विकासाच्या बाबत इतर देशांच्या स्पर्धेत टिकून रहाण्याकरता, त्यांना लहानपणापासून मातृभाषेबरोबरच एआय कसं वापरावं हे शिकवण्याची जास्त गरज आहे..! इतर काही देशांमध्ये शाळेतल्या मुलांना हे शिक्षण देणं सुरु झालं आहे.
(नीलांबरी जोशी या मराठीतील एक आघाडीच्या लेखिका असून नुकताच त्यांचा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – स्वीकार, नकार का सहकार’ या नावाने एक विज्ञान-तंत्रज्ञान विषयक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. स्वतः एक माहिती तंत्रज्ञान(IT) क्षेत्रातील तज्ञ असल्याकारणाने, या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI)/कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा सांगोपांग आढावा घेतला आहे. नीलांबरी जोशी यांची इतर ग्रंथसंपदा : कॉर्पोरेट कल्लोळ, द क्रिएटिव्ह ॲक्ट, माध्यमकल्लोळ, रूप आणि स्वरूप, मनःकल्लोळ(भाग १ व २)
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – स्वीकार, नकार का सहकार’ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
