समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभगाचे छापे
मुंबई, दि. १५ : आयकर विभागाने आज मंगळवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांची पत्नी आभा गुप्ता यांच्या जवळपास ३० ठिकाणांवर छापे टाकले. बेहिशेबी मालमत्तांच्या संदर्भात हा छापा पडल्याची माहिती आहे. अबू आझमी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष असताना गणेश गुप्ता हे समाजवादी पक्षाचे राज्य सचिव होते.
अबू आझमी यांचे कार्यालय असलेल्या कमल मॅन्शनमध्ये हा छापा टाकण्यात आला आहे. हे छापे मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ येथे सुरू आहेत. विनायक निर्मल लिमिटेडवरही आयकर विभागाने छापा टाकला आहे. ही वाराणसी येथील एक कंपनी आहे जिथे आभा गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात अवैध मालमत्ता निर्माण केल्याचा आरोप आहे.
