अखेर नवी मुंबई महानगरपालिकेला लाभला तरुण चेहरा
नवी मुंबई: नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज मावळते महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात विशेषतः कोविड रुग्णांसंदर्भातील अनेक तक्रारींमुळे मिसाळ यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र) असणारे अभिजीत बांगर हे २००८ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत.
नागपूर विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या अभिजित बांगर यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगाव चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर विधायक कार्य केलेले आहे. काही काळात त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले होते.
नवनिर्मित पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी कामगिरी केली. अमरावती जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ओला व सुका कचऱ्याच्या निर्मिती स्थळावरच वर्गीकरण करणे बाबत शहरातील नागरिकांना प्रोत्साहित करीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहराचे मानांकन उंचावले गेले. याशिवाय नागपूर महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी सुविधा, उपक्रमांना चालना दिली. सध्या ते नागपूर विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. विविध लोकाभिमुख वैशिष्ट्यांमुळे कामामुळे कृतिशील प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताना त्यांनी नवी मुंबई शहरातील कोविड-१९ स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असे स्पष्ट करीत सर्वांच्या सहयोगाने नवी मुंबईकर नागरिकांना अभिप्रेत असलेले अधिक चांगले काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला.
