लातूरमध्ये मदत देत असतानाचे फोटो पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होणार; राज्यात इतर ठिकाणी हाच कित्ता गिरवणार का?
टाळे बंदीच्या काळात अनेकजण प्रसिद्धीच्या हव्यासापायी अन्नधान्य, जेवणाची पाकीट तसंच अन्य मदत देत असतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते माध्यमांवर पोस्ट करतात. यातून गरीब, गरजूंचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन अशा आशयाचे फोटो अथवा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असं परिपत्रक लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केलं आहे.
जसे काही प्रसिद्धीपिपासू मदतीचे फोटो प्रसिद्ध करत आहेत तसेच अनके पोलीसही मदतीचे व्हिडिओ आणि फोटो टाकून स्वतःची मार्केटिंग करत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सर्वच तालुका व जिल्हास्तरीय पोलिसांच्या ट्विटर हँडल वर अशा पोस्ट रोजच्या रोज पडताना दिसतात. त्यामुळे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा स्तुत्य निर्णय इतरही जिल्हाधिकारी किंबहुना राज्य सरकारने घ्यावा जेणेकरून दातृत्वाचे ओंगळवाणे प्रदर्शन नक्कीच थांबेल.
