भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवा अखेर सुरु, लवकरच नेरुळ व बेलापूर येथूनही सुरू होणार जलवाहतूक
मुंबईत भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी ही रो रो सेवा आजपासून सुरु झाली. राज्याच्या जलवाहतुकीच्या इतिहासातले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राज्याच्या किनारपट्टीवर अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे ते म्हणाले.
कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी इथे १५० कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर इथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून २ वर्षांत तीही सेवा सुरू होईल.
एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर १९ किमी असून या जलवाहतुकीने १ तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी ४ तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी ५०० प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची आहे.
Credit – AIR
