राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत
मुंबई, दि. २६ : राज्यातील इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या — हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल — यांच्या माध्यमातून राज्यभर इंधन वितरण नियमित व सुरळीत सुरू आहे.
राज्यातील इंधनसाठा समाधानकारक
विभागाकडे प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी राज्यात पेट्रोलचा साठा सुमारे २,०५,२३२ किलोलीटर, डिझेलचा साठा ४,६७,६०३ किलोलीटर तर एलपीजीचा साठा ३०,७६७ मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या दैनंदिन गरजा भागविण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एलपीजी उत्पादनात वाढ
देशातील विविध तेल शुद्धीकरण प्रकल्पांकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा साखळी अखंडित राहिली असून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाही.
वितरण यंत्रणा प्रभावी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा होत आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडूनही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक मजबूत झाला आहे. संबंधित विभागांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
नागरिकांना आवाहन
अफवा, सोशल माध्यमांवरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भीतीपोटी इंधनाचा साठा करून ठेवू नये तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी टाळावी. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी.
शासनाचे नियंत्रण कायम
सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासनाकडून इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात आले असून परिस्थिती प्रभावीपणे हाताळली जात आहे. इंधनपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ही स्थिती पाहता राज्यात इंधनाबाबत कोणतीही टंचाई नसून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
