आधी २० नगरपरिषदांची निवडणूक पुढे गेली आता आजच्या मतदानाचे निकालही गेले पुढे
नागपूर/मुंबई, दि. २: राज्यात आज नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडत असून उद्या निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणं अपेक्षित असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका आदेशाने सर्व चित्र पालटलं. उद्या दिनांक २ डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे व निकाल दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड उठवण्यात आली.
आज मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने आदेश दिला की आजच्या मतदानाचे निकाल हे उद्या जाहीर न करता एकत्रच २१ डिसेंबर रोजीच जाहीर करावेत. शिवाय आजच्या मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यास मज्जाव करण्यात आला असून ते आता २० डिसेंबरला मतदान झाल्यावर अर्ध्या तासाने जाहीर करता येणार आहेत.
