फ्लॅनौट सास प्रा. लि. विरोधात हिंजवडी पोलिस स्थानकात व कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल
पुणे, दि. २०: नोकरीचं आमिष दाखवून नवख्या उमेदवारांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक केल्या बाबतच्या बातम्या वरचेवर आपल्या कानांवर पडत असतात. परंतु अशा प्रकरणांत कोणा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीकडून ४०० हुन अधिक उमेदवारांची एकाच वेळी फसवणूक झाल्याचे शक्यतो ऐकिवात आलेले नाही. पण होय अशी घटना घडली आहे आणि ती हि देशातील एक प्रमुख माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात. पुण्यातील हिंजवडी भागातील फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) कंपनीने कथितरित्या ४०० नवख्या उमेदवारांकडून नोकरीच/प्रोजेक्टचे आमिष दाखवत प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रत्येकी १ लाख ते ४ लाख रुपये उकळल्याचा आरोप इथल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पुण्यातील हिंजवडी येथील फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीवर कथित पीडित कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे कि कंपनीने नोकरीचं आमिष दाखवत त्यांच्याकडून प्रशिक्षणाच्या नावाखाली १ ते ४ लाख रुपये घेतले. हे पैसे घेताना त्यांना असं सांगण्यात आलं कि दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान त्यांना १५,००० रुपये स्टायपेंड/विद्यावेतन देण्यात येईल व त्यांनंतर वार्षिक ३ ते ८ लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी देण्यात येईल. सुरुवातील या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यानचे विद्यावेतन मिळाले मात्र यानंतर दर महिन्याला ठरल्याप्रमाणे त्यांना नियमित वेतन मिळालेच नाही. उपलब्ध माहितीनुसार कंपनीने या नव उमेदवारांचे जवळपास ४ ते ६ महिन्याचे वेतन थकवले. जेव्हा या उमेदवारांना आपली फसवणूक केली जात असल्याचे जाणवले तेव्हा त्यांनी कंपनीकडे त्यांचे पैसे परत मिळावेत म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली. यावेळी मनुष्यबळ विभागाकडून त्यांची वेळोवेळी बोळवण तर करण्यात आलीच परंतु, याच सोबत त्यांनी आम्हाला “तुमचा आयपी ॲड्रेस व लोकेशन ठाऊक असून आम्ही तुमच्या हालचाली ट्रेस करू” असे म्हणत आपल्याला धमकावल्याचा गंभीर आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. उमेदवारांकडून जवळपास १० कोटी रुपये उकळल्याचे सांगितले जात आहे.
ध्यानीमनी नसताना पहिल्याच नोकरीत अशा फसवणुकीचा सामना करावा लागल्यामुळे हतबल झालेल्या या कर्मचाऱ्यांनी अखेर माध्यमांसह पुण्यातील ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉयिस्’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेकडे धाव घेतली. संस्थेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी या उमेदवारांसह कामगार आयुक्तांचे कार्यालय गाठत लेखी तक्रार दिली. याच सोबतच पीडित उमेदवारांच्या वतीने फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) च्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाणे येथे फसवणुकीची तक्रार देखील दाखल केली. ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉयिस्’ चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी यावेळी नुकतीच अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना अशा प्रकारच्या तथाकथित प्रशिक्षण व नोकरी (ट्रेनिंग व प्लेसमेंट) देणाऱ्या कंपन्यांपासून दोन हात लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) बाबत थोडक्यात
महाराष्ट्र वार्ताच्या शोधपत्रकारिता टीमने फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) चा अभ्यास केला असता असं आढळून आलं कि हि एक वन पर्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी(OPC) असून तिची नोंदणी कंपनी निबंधक म्हणजेच रजिस्टार ऑफ कंपनीज, पुणे यांच्या कार्यालयात दिनांक १६ मार्च २०२३ रोजी करण्यात आलेली आहे. पूनम उपेश पाटील या कंपनीच्या विद्यमान संचालिका असून उपलब्ध माहितीनुसार उपेश पाटील हे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) व नामनिर्देशित सदस्य(Nominee) आहेत. कंपनीच्या रोजच्या कामकाजामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ७ डिसेंबर २०१५ रोजी जळगाव येथे नोंदणी झालेल्या NOCTURNAL SOFTWARES PRIVATE LIMITED या कंपनीचे ते संचालक हि आहेत. पूनम उपेश पाटील यांच्या नावे आणखी एक कंपनीची नोंद आढळून येते जिचं नाव फ्लॅनौट सास ट्रेनिंग अँड डेवलपमेंट प्रा. लि. असून उपेश पाटील हे याही कंपनीचे नामनिर्देशित सदस्य(Nominee) आहेत. या दोन्ही कंपन्या हिंजवडीतील एकाच पत्त्यावरील कार्यालयातून चालवल्या जात आहेत.
कंपन्यांच्या मालकांसह मानव संसाधन(HR) व्यवस्थापकांवर हि गुन्हा नोंदवल्यास बसू शकतो घोटाळ्यांवर आळा
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था सध्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांसारखी झालेली आहे. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली तासंतास काम करवून घेऊन कालांतराने वाईट परफॉर्मन्स रिव्यूचे कारण देत त्यांना अचानक नारळ दिला जातो. काहीठिकाणी तर थकीत पगार मागायला गेल्यावर त्यांना वर्कलॉग किंवा तत्सम कारण देत अक्षरशः नाडलं जातं. अखेर कर्मचारी एक दिवस कंटाळतात आणि आपल्या मेहनतीच्या पैशांवर पाणी सोडून देत नवीन कंपनी शोधतात. अनेकदा रिलिविंग लेटर च्या बदल्यात थकीत वेतनाचा सौदा केला जातो. मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद, मैसूर, गुरगाव इथल्या अनेक छोट्या ते मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांची हीच मोडस ऑपरेंडी असल्याचे मागील काही काळापासून पाहायला मिळतंय. शिवाय, अशा प्रकारच्या वेतन घोटाळ्यांमध्ये कंपनीच्या मालक-संचालक-व्यवस्थापक यांच्या सोबतीने मानव संसाधन(HR) विभागाचाहि सक्रीय सहभाग असतो. अशावेळी या दोघांमध्ये कर्मचाऱ्यांचा अक्षरशः फूटबॉल होतो. त्यामुळे आगामी काळात असे प्रकार समोर आल्यास पोलिसांनी गुन्हे नोंदवताना कंपनीच्या मालक-व्यवस्थापनासोबतच मानव संसाधन(HR) विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करावे. जेणेकरून एचआर मॅनेजर स्वतःहून पुढे येत अशा प्रकारच्या घोटाळ्यांची माहिती पोलीस यंत्रणांना देतील. असे प्रावधान नव्याने झालेल्या भारतीय न्याय संहिता, २०२३ मध्ये आहे, फक्त त्यांची अंमलबजावणी १०० टक्के होताना दिसत नाही.
अँबिशन बॉक्स (Ambition Box) या कंपन्यांचे कामगारांसोबतच्या व्यवहाराचे पुनरावलोकन(Review ) करणाऱ्या वेबसाईटला भेट दिल्यास अनेक कर्मचाऱ्यांनी फ्लॅनौट सास प्रा. लि. (Flynaut Saas Pvt. Ltd.) बाबत वरील प्रमाणे आलेले आपले अनुभव सविस्तरपणे नमूद केले आहेत. पोलीस तपासात फ्लॅनौट ने मागील १० वर्षांत आणखी किती नवख्या उमेदवारांची/कर्मचाऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे ते उघड होईल. पण भविष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी राज्य सरकारांसह केंद्र सरकार ने हि एमपीआयडी (MPID act)च्या धर्तीवर कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी कठोर कायदे आणल्यास कोणतीही कंपनीची घोटाळे करण्याची धडगत होणार नाही इतकं नक्की.
विकासकाकडून फसवणूक व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 9372236332 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.
