आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी यांनी घेतली नोडल अधिकाऱ्यांची बैठक
अलिबाग, दि. १२: आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या कामाना गति द्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी, निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात सर्व नोडल व सहायक नोडल अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह २३ समित्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये
मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक व्यवस्थापन, आदर्श आचार संहिता, बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, प्रसार माध्यम आणि संदेशवहन, निवडणूक निरीक्षक, प्रशिक्षण आणि जनजागृती, मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील किमान मूलभूत सुविधा, दिव्यांग मतदार, स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूक विषयक कामकाजासाठी नोडल अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निवडणूक कालावधीमध्ये करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने नोडल अधिका-यांना सोपविण्यात आलेल्या कामकाजाबाबतच्या सूचना दिल्या. मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची खात्री करा. शांततापूर्ण निवडणुकांसाठी सुरक्षा योजना तयार करा. पोस्टल मतदानासाठी पात्र व्यक्तींना पोस्टल मतदानाबाबतची माहिती मुदतीत देण्यात यावी. कोणत्या मतदारांना टपाल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे हे देखील बीएलओला माहीत असावे. सोशल मीडियावर विशेष नजर ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निवडणुकीवर प्रभाव टाकणारी सामग्री रोखण्यासाठी जिल्हा आणि राज्याच्या सीमेवर चौक्या उभारण्यात याव्यात. फ्लाइंग स्क्वॉड आणि एसएसटीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. निवडणूक संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या सी-व्हिजिल मोबाईल ॲपवर लक्ष ठेवावे. तात्काळ निराकरण करावे. मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. आदिवासी वाडया वस्त्या याठिकाणी तसेच मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागाकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिले.
विधानसभा निवडणूक 2024 करिता ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची जनजागृती करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी किशन ना जावळे यांच्या हस्ते EVM प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन करणेत आले. सदर प्रसंगी माननीय अपर जिल्हाधिकारी रायगड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड व निवासी उपजिल्हाधिकारी रायगड उपस्थित होते.
