सामाजिक बांधिलकी जपत के. रहेजा ग्रूपने केले वाटप
नवी मुंबई, दि. ३१: दैनंदिन स्वच्छतेव्दारे शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून स्वच्छताकर्मींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने जॅकेट्स उपलब्ध करुन देणाऱ्या के. रहेजा ग्रुपचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आभार व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देत असल्याने त्याचा फायदा शहरातील व्यावसायिकांना व्यवसाय वृध्दीसाठी होत असून त्या अनुषंगाने शहरातील उदयोग समुह, आस्थापना यांनी शहर विकासात योगदान दयावे असे आवाहनही त्यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मित्रांना जॅकेट वितरण कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरिष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि के. रहेजा ग्रुपचे सल्लागार किशोर भतिजा उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना किशोर भतिजा यांनी नवी मुंबईच्या स्वच्छतेसाठी के. रहेजा ग्रुपचे काही येागदान असावे या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी त्यांना पोशाखावर परिधान करण्यासाठी जॅकेट्स देण्याचे निश्चित करण्यात आले असे सांगितले. या जॅकेट्सवर कचरा वर्गीकरण करण्याविषयी जनजागृतीपर संदेश ओलू, सुकू व घातकू या मॅस्कॉटच्या माध्यमातून देण्यात आला असून निश्चय केला नंबर पहिला हे ध्येय वाक्य ठळक स्वरुपात प्रदर्शित करण्यात आले आहे. या जॅकेट्सचा उपयोग स्वच्छताकर्मींच्या सुरक्षिततेसाठी होईल असे सांगत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ‘टोक दो’ या अभियानाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेप्रमाणेच स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छतेवर भर देत असल्याचे सांगितले. के.रहेजा ग्रुप संचलित इनॉर्बिट मॉलच्या वतीने स्वच्छताकर्मींसाठी ३१०० जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात आली असून यामध्ये यशलोक वेल्फेअर फाऊन्डेशन यांनी सहयोगाची भूमिका बजावली आहे.
