कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठासमोर होणार सुनावणी
कोलकाता, दि. १९: कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून उद्या त्यावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हे या पीठाचे सदस्य आहेत. पीडित डॉक्टरचे पालक आणि काही व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांची दखल घेत या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं १३ ऑगस्टला दिले होते. त्यानंतर आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन सुरू असताना तिथे झालेल्या तोडफोडी बद्दल न्यायालयानं नुकतंच पश्चिम बंगाल प्रशासनालाही या प्रकरणी जाब विचारला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांना आपल्या परिसरातली सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे निर्देशही राज्यपालांनी राज्यभरातल्या रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
Source – AIR
