‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेचा लाभ उपलब्धतेसाठी १४ व २० ऑगस्ट रोजी नवी मुंबई पालिका मुख्यालयात विशेष शिबिराचे आयोजन
नवी मुंबई, दि. १३: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दि. ९ जुलै २०२४ चा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.90/व्यशि-3 नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत ६ महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणे कामी ३० संवर्गातील एकूण १९४ पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
याबाबत सविस्तर जाहिरात, पदसंख्या व शैक्षणिक अर्हता शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याकरिता शिकाऊ उमेदवारांना शासनामार्फत दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यामध्ये १२ वी पास उमेदवारांना रु. ६,०००/-, आय.टी.आय./पदविका धारक उमेदवारांना रु. ८,०००/- आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना रु. १०,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. याद्वारे पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की, दि. १४.०८.२०२४ व दि. २०.०८.२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र. १, सेक्टर १५ ए, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
यानुसार, संबंधितांनी आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक, मेल-आयडी/शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक तपशील इ. कागदपत्रांसह १४ व २० ऑगस्ट रोजी सदरील ठिकाणी उपस्थित रहावे. प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दि. ०९.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. तरी पात्र युवकांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा लाभ घेण्यासाठी दिनांक १४ व २० ऑगस्ट २०२४ रोजी महापालिका मुख्यालयात आयोजित शिबिरास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
