अव्वल कुस्तीपटू ठरले आंतर SAI कुस्ती स्पर्धा २०२४-२५ साठी पात्र
मुंबई, दि. १२: युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI), ७ आणि ८ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील SAI प्रादेशिक केंद्रात SAI आंतर-क्षेत्रीय कुस्ती स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमारे १५० कुस्तीपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

देशातील विविध आखाडे आणि SAI च्या खेलो इंडिया केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या क्रीडापटूंनी असामान्य प्रतिभा आणि कौशल्य यांचे दर्शन घडवले. या स्पर्धेमुळे कुस्तीपटूंना त्यांच्या क्षमता दाखवण्यासाठी आणि आणखी उच्च स्तरावर खेळण्यासाठी पूर्वानुभव म्हणून एक महत्वपूर्ण व्यासपीठ लाभले.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेले कुस्तीपटू प्रतिष्ठित अशा आंतर SAI कुस्ती स्पर्धा २०२४-२५ मध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरले. ही आगामी स्पर्धा म्हणजे कुस्तीमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या त्यांच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. 
मुंबईतील SAI प्रादेशिक केंद्र, युवा कुस्तीपटूंच्या प्रतिभेला अधिक उंचीवर नेण्याच्या आणि त्यांच्यातील गुण विकसित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार अखंड कार्यरत आहे.
