विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधीपक्षनेत्यांची खास खलबतं !
मुंबई, दि. २६: उद्या दि. २७ जून २०२४ पासून महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन नक्कीच वादळी होईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यासमोरील विविध प्रश्न व त्याबद्दल अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या भूमिकेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस विधीमंडळ नेते व आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार भाई जगताप, आमदार राजेश राठोड, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी उपस्थित होते.
