लोकसभा सभापतीपदासाठी रालोआकडून माजी सभापती ओम बिर्लांसमोर कॉंग्रेसच्या ‘या’ खासदाराने दाखल केला अर्ज
नवी दिल्ली, दि. २५: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा सभापतीपदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. गेल्या लोकसभेतही ते सभापती होते. विरोधकांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभेचे सभापती एकमताने नियुक्त झाले आहेत. यंदा दोन उमेदवार रिंगणात असल्याने ७१ वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक होण्याची शक्यता आहे.
सभापतीपदाच्या उमेदवारावर सहमती व्हावी यासाठी सरकारने विरोधकांशी चर्चा केली होती. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग आणि पीयूष गोयल यांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि द्रमुक नेता टी. आर. बालू यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनाही फोन करुन सत्ताधारीपक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. पण विरोधकांनी उप सभापतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. उप सभापतीपदावरच्या उमेदवाराचं नाव योग्य वेळी जाहीर करू असं सत्ताधारी पक्षाने सांगितलं. त्यामुळे सभापतीपदाच्या उमेदवाराची नेमणूक एकमताने करण्यावर सहमती झाली नाही. सरकारच्या लोकसभा सभापतीपदाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. पण सरकारने उप सभापती पद विरोधी पक्षाला द्यावं अशी मागणी सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.
