नवी मुंबईतील सारसोळे जेट्टी परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम
नवी मुंबई, दि. १६: स्वच्छतेचा वसा जपण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक स्थानिक पातळीवर होणाऱ्या स्वच्छता मोहिमांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असून अशाच प्रकारची एक विशेष मोहीम नेरूळ विभाग कार्यक्षेत्रातील सारसोळी जेट्टी परिसरात मँग्रुव्हज सोल्जर व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सेवाभावी संस्थेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह उत्साहात राबविण्यात आली. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व परिमंडळ १ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये आय.आर.एस. समीर वानखेडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी दिनेश वाघुळदे आणि नमुंमपा स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी तसेच धर्मेश बराई आणि त्यांच्या मॅंग्रुव्हज सोल्जर या संस्थेचे स्वयंसेवक, बीच क्लीन या संस्थेचे प्रतिनिधी, एसआयईएस कॉलेजच्या एनएसएस युनिटचे विद्यार्थी तसेच इतरही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते.
मॅंग्रुव्हज सोल्जर ही संस्था पर्यावरण संरक्षण संवर्धन क्षेत्रात सेवाभावी दृष्टीने काम करीत असून दर आठवड्यात सुट्टीच्या दिवशी त्यांच्यामार्फत विशेष सफाई मोहीम सातत्याने राबवली जात आहे. आजची मोहीम ही २०० वी मोहीम होती. यामध्ये सहभागी संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी सारसोळी जेट्टी परिसरातील प्लास्टिक व पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले तत्सम पदार्थ गोळा करून खाडी किनारा स्वच्छ केला.
