शरद पवार गटाला नवं नाव मिळालं ! वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही
मुंबई/नवी दिल्ली, दि. ७: लोकसभा निवडणुक २०२४ च्या नेमकं आधी शरद पवार यांच्या ताब्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दोन शकलं पडतील अशी राजकीय क्षेत्रात अटकळ मांडली जात होती. काल निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हाच मूळ पक्ष असल्याचे सांगात पक्षाचे नाव व घडळ चिन्ह त्यांना दिले जात असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या ताब्यातील गटाला नवीन नाव व पक्ष चिन्हासह आगामी निवडणुका लढवाव्या लागतील हे स्पष्ट झालं होतं. सध्यातरी नावाबाबत चा तिढा सुटला असून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नवं नाव त्यांना मिळालं आहे.
शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार तीन नावांची मागणी केली होती. अखेर या तीन नावातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. चिन्हाबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाची मागणी करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पक्षाबाबत जाहीर झालेल्या निकालानंतर शरद पवार यांच्या गटातील नेत्यांनी अजित पवार व भाजपवर निशाणा साधला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेतली व निकालाची समिक्षा केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका केली आहे.
