ज्येष्ठ भाजप नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि. ३: भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अडवाणी यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांचं अभिनंदन केलं. अडवाणी हे आपल्या काळातल्या आदरणीय राजकारणी व्यक्तिमत्वांपैकी एक असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
१९४७ मधे झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीदरम्यान भारतात आलेल्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेत देखील त्याचं मोठं योगदान आहे. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं ससंदीय राजकारणात सक्रीय होते. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी देशाचं उपप्रधानमंत्रीपद भूषवलं होतं. आडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारम मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही आडवाणी यांचं अभिनंदन केलं.
