शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता होणार सोमवारी
मुंबई/नवी दिल्ली, दि. १७: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र ठाकरे यांच्या वकीलांनी सोमवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडचा पक्ष हाच मूळ शिवसेना राजकीय पक्ष आहे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले सर्व १४ आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधीमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे. त्यांना १ तारखेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं असून याप्रकरणी ८ फेब्रुवारीला पुढची सुनावणी होईल.
