काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांचा माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश
मुंबई, दि. १४: काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. देवरा यांनी कालच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत आज काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
मिलिंद देवरा हे कॉंग्रेसचे माजी खासदार मुरली देवरा यांचे चिरंजीव असून कॉंग्रेस घराणे विशेषतः राहुल गांधी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. परंतू, महाविकास आघाडीतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित झाल्यावर याचं मतदारसंघात वयाच्या अगदी २७ व्या वर्षी खासदार म्हणून निवडून आलेल्या देवरा यांच्या मनात पक्षाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना उत्पन्न झाली. आणि नेमक्या याच वेळी शिंदे गटाच्या गळाला मिलिंद देवरा लागले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत.
मिलिंद देवरा यांच्यासोबत जैन, मारवाडी, मुस्लीम समाजाचे १० माजी नगरसेवक, २० पदाधिकारी आणि ४५० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी खासदार गजानन किर्तीकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, भायखळा विभागप्रमुख यशवंत जाधव, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने आज काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेऐवजी, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसाठी न्याय यात्रा सुरू केली तर बरं होईल, अशी टिप्पणी भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली.
Source – AIR
