देशभर चालू असलेल्या वाहतूकदारांच्या संपासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाची अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेससोबत बैठक
नवी दिल्ली/मुंबई, दि. २: वाहतूकदारांच्या संपासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय आज अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेससोबत बैठक घेत आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. भारतीय न्याय संहितेत हिट अँड रनमध्ये ७ लाख रुपयांचा दंड आणि १० वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याला देशभरातल्या वाहतूकदारांचा विरोध असून त्याविरोधात ट्रक, टँकर चालक संप करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे ही शिक्षा वाढवण्यात आल्याचं गृहमंत्रालयातल्या सुत्रांनी सांगितलं.
मनमाडमध्ये टँकर चालकांनी संप मागं घेतला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्यानं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला इंधन पुरवठा सुरळीत होईल. धुळ्यात वाहतूकदारांचा संप कायम आहे. त्याला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. वाहन चालक संघटनेनं आज आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
हिंगोलीतल्या ५१ पैकी १५ इंधन पंपावर पेट्रोल-डिझेल संपल्याची माहिती आहे. इतर ठिकाणी पंपचालक इंधन देताना आखडता हात घेत आहेत. वाशिममध्ये वाहतूकदारांनी तोंडगाव टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोलापूरमध्ये पोलिसांनी नव्या कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानंतर टँकर चालकांनी संप मागे घेतला आणि वाहतूक सुरू केली.
भारतीय न्याय संहितेतल्या हिट अँड रन संदर्भातल्या तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातले चालक उद्या नवी दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन करणार आहेत. त्यात देशभरातल्या साडे सातशेहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली.
Source – AIR
