पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत नेदरलँडला नमवत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
मलेशियात क्वाललंपूर येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँडला ४-३ असं हरवलं आहे. मध्यंतराला भारत ०-२ अशा पिछाडीवर होता. मात्र आदित्य लालगे आणि अरजित सिंग हुंदल यांनी केलेल्या गोलमुळे भारताला बरोबरी साधता आली. त्यानंतर ऑलिव्हीयर याने केलेल्या गोलमुळे नेदरलँडने पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला सौरभ कुशवाह, आणि शेवटची तीन मिनिटं शिल्लक असताना कर्णधार उत्तम सिंगने गोल करत भारताला विजय मिळवून दिला. आता येत्या १४ डिसेंबरला उपांत्य फेरीत भारताचा सामना जर्मनीसोबत होणार आहे.
