माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन; मुख्यमंत्री शिंदे यांनी वाहिली आदरांजली
अहमदनगर, दि. २७: माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं निधन झालं. राज्यात त्यांनी सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास खात्याचं मंत्रीपद भूषवलं होतं. उद्या दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ढाकणे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचीत, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरिरीने मांडले.
