नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण १०० टक्के भरले
नवी मुंबई, दि. २४: यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण संपूर्ण १०० % भरले असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज २४सप्टेंबर रोजी मध्यरात्री रात्री १.३० वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे १५ से.मी. उघडण्यात आलेले आहेत व ६७५ क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे.
यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३५४०.०० मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईची पाण्याची चिंता पुर्णपणे मिटली आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.
