hijab Naqab Burkha
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत चेहरा झाकणाऱ्या बुरखा, नकाबवर आजपासून बंदी
श्रीलंका : २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका एकामागोमाग झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेला होता. या हल्ल्यात जवळपास ३५० नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात सामील असलेल्या एका मसाले उद्योगातील परिवारातील सदस्यांसह जवळपास १५ दहशतवाद्यांचा सुरक्षादला बरोबरील चकमकीत खात्माही झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने आता देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सावध पण कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. काल रात्री उशिरा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी ट्विट करून एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्या निर्णयानुसार आज दि.२९ पासून श्रीलंकेत चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्यामुळे ओळख लपवता येऊ शकते व त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी धोका निर्माण होऊ शकतो अशांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे श्रीलंकेत बुरखा, नकाब, फॅन्सी मास्क इत्यादींवर बंदी आली आहे. या बंदीच ‘सिलोन जमैयतुल उलेमा’ या मुस्लिम संघटनेने स्वागत केलं आहे. त्यांनीही देशातील मुस्लिम महिलांना देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा अथवा नकाब न परिधान करण्याचे आवाहन केले आहे.
