भारतीय जनता पक्षाची नवी केंद्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ तीन नावांचाही समावेश
नवी दिल्ली, दि. २९: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली नवी टीम जाहीर केली आहे. ३८ पदाधिकाऱ्यांच्या या यादीत नव्या-जुन्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांना नड्डा यांच्या कोअर टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
अनिल अँटनी यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अनिल अँटनी यांनी बीबीसीच्या माहितीपटाच्या वादावर काँग्रेस पक्षाकडून वेगळी भूमिका घेतली होती, त्यानंतर त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. याच मुद्द्यावरून अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
महाराष्ट्रातील विनोद तावडे यांना पुन्हा एकदा सरचिटणीस पद देण्यात आले आहे. याच शिवाय गेले काही दिवस पक्षावर नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिव पदी पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातून विजया राहटकर यांचीही राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे,
उत्तर प्रदेशातून आलेले आणि गोरखपूरचे आमदार असलेले राधामोहन अग्रवाल यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवून पक्षाने यूपीसाठी मोठा संदेश दिला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले नाही, त्यामुळे त्यांची नाराजी असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यावेळी त्यांना भविष्यासाठी पक्षाकडून आश्वासन देण्यात आले होते. आता त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. अग्रवाल सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.
नड्डा यांच्या संघातील कैलाश विजयवर्गीय, तरुण चुघ, विनोद तावडे, अरुण सिंग, दुष्यंत गौतम यांना पुन्हा संधी देण्यात आली असून त्यांना पुन्हा सरचिटणीस बनवण्यात आले आहे. शिवप्रकाश यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रमण सिंह, रघुवरदास यांना नड्डा यांनी त्यांच्या संघात राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे. छत्तीसगडमधून आलेल्या सरोज पांडे यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्ष, नरेश बन्सल यांना सहकोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. व्यंकय्या नायडू यांचे माजी सहकारी सत्य कुमार, नोएडाचे माजी खासदार सुरेंद्र सिंह नगर, बिहारमधून येणारे ऋतुराज सिन्हा यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले आहे.
