निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कृषिमंत्री सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, दि. १३: राज्याचे कृषिमंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे अडचणीत आले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर गुन्हा दाखल झाला आहे. साल २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मालमत्तेची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार २०१४ मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची किंमत २०१९ मध्ये जास्त घोषित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या चौकशीत अशा एकूण ४ ते ५ मालमत्तांच्या संदर्भात दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच याप्रकरणी सिल्लोड न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ मध्ये ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर ही माहिती समोर आली. सिल्लोड येथील न्यायालयाने सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या माहितीतील तफावत मान्य करत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश बुधवारी दिले. हे आरोप सिद्ध झाले तर अब्दुल सत्तार यांना आमदारकीवर पाणी सोडावं लागू शकतं तसेच ते ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवले जाऊ शकतील.
महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी या संदर्भात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने शंकरपल्ली यांनी दोनदा न्यायालयात धाव घेतली. तिसऱ्यांदा कोर्टाने केसनिहाय तपासाचे आदेश दिले. सत्तार यांचा जबाबही नोंदवण्यात आला. अखेर अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
