खा. सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती
मुंबई, दि. ३: महाराष्ट्रातील राजकीय वादळ अधिकच गडद होत चालले आहे. काल रविवारी (दि. २ जुलै) रोजी झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटातून नव्या नियुक्त्या व बडतर्फी केल्या जात आहेत. अजित पवार गटाने सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. आज सोमवार दि. ३ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर कारवाई करत शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी केली.
त्याचवेळी जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार सुनील तटकरे यांना असतील. प्रफुल्ल यांनी स्वत:चे कार्याध्यक्ष म्हणून वर्णन केले आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर लगेचच हा निर्णय आला आहे.
