ओबीसींवर अन्याया केला जात असल्याच्या आरोपाचेही केले खंडन
मुंबई, दि. २६: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केली होती. यावर आता राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली आहे. असे निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही, पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या स्थापना दिनानिमित्त त्यांना महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेतून मुक्त करून संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली होती.
शरद पवार यांनी नुकतीच त्यांची कन्या आणि लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षात पदोन्नती देत देऊन त्यांना कार्याध्यक्ष बनवले आहे, याच सोबत प्रफुल्ल पटेल यांनाही कार्याध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. अजित पवार यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल शरद पवारांना विचारले असता, हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. आज प्रत्येकाला पक्ष संघटनेसाठी काम करायचे आहे, हीच भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस केवळ नावापुरतीच ओबीसींचा वापर करते, पण पक्षात कोणत्याही ओबीसी नेत्याला पद देत नाही, असा आरोप करणाऱ्या विरोधकांबाबत विचारले असता, शरद पवार म्हणाले की, अशी विधाने त्यांचे अज्ञान दर्शवते. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते, ते कोण? त्यांच्यानंतर मधुकरराव पिचडही याच पदावर होते. त्यांच्या पाठोपाठ सुनील तटकरे होते, ते कोण होते? संपूर्ण यादी पहा. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही हे भाजपच्या नेत्यांनाही माहीत आहे, असे शरद पवार म्हणाले.
