“महापुरुषांबद्दल इतिहासाची मोडतोड करून लिखाण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज” – छगन भुजबळ
मुंबई, दि. २९: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
‘इंडिक टेल्स’ नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध केला आहे.
एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करत आहेत. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
