ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा
कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आले आहेत. बंगळुरू इथं काल उशिरा झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. तसा ठरावही संंमत करण्यात आला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र सिंग आणि काँग्रेस नेता दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.त्यानंतर काल एका हॉटेलमध्ये विधानसभा सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी हॉटेलबाहेर या दोन्ही इच्छुकांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
त्यांनी घोषणाबाजी करत आपापला नेता पुढचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी लावून धरली. दरम्यान काल उप निवडणूक आयुक्त अजय बडू, कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना आणि राज्य निवडणूक आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांनी कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांची भेट घेतली आणि २२४ नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची यादी असलेलं परिपत्रक त्यांना सुपूर्द केलं.
