कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द
नवी दिल्ली, दि. २४: सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यानंतर त्यांना केरळमधील वायनाडमधून त्यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. लोकसभा सचिवालयाने अधिसूचना निर्गमित करून ही माहिती दिली. लोकसभा सचिवालयाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश २३ मार्चपासून लागू होईल.
सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या मोदी आडनावावरील टिप्पणीबद्दल २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मात्र गांधींना जामीन मंजूर केला आणि त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी ३० दिवसांसाठी स्थगित केली, जेणेकरून काँग्रेस नेते या निकालाला आव्हान देऊ शकतील.
सदस्यत्व रद्द झाल्यानंतर आज संध्याकाळी ६ वाजता राहुल गांधी यांच्या घरी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीसंदर्भात सोनिया गांधी त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “आमच्या नसात धावणाऱ्या रक्ताची एक खासियत आहे… तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहासमोर कधीही झुकलो नाही आणि कधीही झुकणार नाही. तुम्ही काहीही करू शकता.”
राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लखनौ मध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. हजरतगंज येथील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी, नकुल दुबे यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. यानंतर या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
