राजकीय नेतेही रंगले रंगात
मुंबई, दि. ७: मुंबईसह राज्यभरात कालच्या होळी पुनवेनंतर आज धूलिवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस सतर्क होते. सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी पोलीसांनी बंदोबस्त वाढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे इथल्या निवासस्थानी धुळवडीचा सण मोठया उत्साहात साजरा केला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांसोबतही त्यांनी धुळवड साजरी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यासह अनेक राजकीय नेतेही धुळवडीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांसह रंगले होते.
मुंबईत अनेक गृहनिर्माण संस्थांनी नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा या दृष्टीने व्यवस्था केली होती. विविध कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले होते.
मुंबईत अनेक गृहनिर्माण संस्थांनी नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा या दृष्टीने व्यवस्था केली होती. विविध कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले होते.
जालना शहरात १३४ वर्षांची परंपरा असलेल्या धूलिवंदन हत्ती रिसला समितीच्यानं राजा-प्रधानाची पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढली. हत्तीवर बसलेल्या राजानं नागरिकांच्या दिशेनं रेवड्या आणि फुलांची उधळण केली. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या आदिवासी तसंच बंजारा समाजातल्या महिला आणि पुरुषांनी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत एकमेकावर रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली.
