अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव गुन्हा दाखल होण्याबाबत ठाम
नागपुर, दि. २५: नागपूर पोलिसांनी आज धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी सांगितले की, या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आहे, आम्हाला आधीच असा निर्णय अपेक्षित होता. विशेष म्हणजे, नागपूर पोलिसांनी आज बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. नागपुरातील कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यानंतर एक माध्यमाशी बोलताना श्याम मानव म्हणाले की, धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपुरातील कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवली नाही, भूतबाधा झाली नाही, असे आज पोलीस सांगत असतील, पण महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अन्वये धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आजही आम्ही याबाबत ठाम आहोत.
श्याम मानव म्हणाले की, पोलिसांच्या या निर्णयानंतर आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे जादूटोणा विरोधी कायद्याचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्याकडून लेखी उत्तर आल्यानंतर याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा विचार करू.
बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांना आव्हान देणाऱ्या श्याम मानव यांना धमकीचे फोन आल्याची बातमी समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांनी ते राहत असलेल्या ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्यासमोर चमत्कार दाखवण्याचे आव्हान दिले होते.
