सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक
गांधीनगर, दि. ३०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे अहमदाबाद येथील एका रुग्णालयात आज पहाटे साडेतीन वाजता निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी कुटुंबातले सदस्य, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.
मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हिराबेन यांचं शंभर वर्षांच संघर्षमय जीवन भारतीय आदर्शांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखर मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हिराबेन यांनी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे, असं शहा यांनी म्हटलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या मातोश्रींच्या निधनामुळे दुःख झाल्याचं म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हिराबेन यांचं जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आईचं निधन हे सर्वात मोठं दुःख असून त्यांचा चांगुलपणा, काळजी, आणि प्रेम सदैव सोबत असेल असं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून तीव्र शोक प्रकट केला आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिराबेन यांचं संघर्षमय आणि सद्गुणी जीवन प्रेरणादायी असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मोदींच्या मातोश्रींच्या निधनाबाबद्दल विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
