केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती
नवी दिल्ली, दि. १५: इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत १९ देशांचे १७७ परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिली.
राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत इस्रोने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लड आणि अमेरिका या देशांचे १७७ परदेशी उपग्रह पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही-एमकेआयआयआय प्रक्षेपकांनी व्यावसायिक करारांतर्गत यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.
जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत या १७७ परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे ९४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि ४६ दशलक्ष युरोचे परदेशी चलन प्राप्त झाल्याची माहितीही डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. याशिवाय, अवकाश उपक्रमांबाबत गैर सरकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याकरता तसेच त्यांच्या हाताळणीसाठी इन-स्पेस ही एक खिडकी व्यवस्था उभारल्याने याबाबत स्टार्टअप्स क्षेत्रात लक्षणीय रस दिसून आला. परिणामी, इन-स्पेस डिजिटल मंचावर आतापर्यंत १११ अवकाश स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे.
