Devendra Fadanvis with Family
VIDEO : विदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजल्या पासून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे.
या सात जागांसाठी एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ हजार ९१९ मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वाधिक ३० उमेदवार हे नागपूर मतदारसंघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आहेत.
नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आईंसह मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी बोलताना, देशात मजबुत सरकार यावं यासाठी मतदान करत असल्याचे ते म्हणाले. पुढच्या ५ वर्षाकरिता देशाचा कारभार सक्षम हातात देण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हटले. तसेच, जास्तीत-जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय हंसराज अहिर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार सुरेश धानोरकर आदी दिग्गंजाचे भवितव्य ईव्हीएममध्ये आज सीलबंद होणार आहे.
लोकशाहीत निवडणूक ही महत्वाची प्रक्रिया !
प्रत्येकाने देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान अवश्य करावे ! pic.twitter.com/utI05rvOnP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 11, 2019
