मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळली
मुंबई, दि. २३ : दादर येथील शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने दादरचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. स्वतःला मूळ शिवसेना म्हणवून घेणाऱ्या सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याची मागणी करत उद्धव ठाकरेंच्या याचिकेत हस्तक्षेप केला होता.
दसरा मेळाव्याला परवानगी देताना कोर्ट नेमकं काय म्हणालं?
मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याला परवानगी दिली असली तरी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे, याची विशेष काळजी घ्यावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम इतकी वर्षे सुरू असून आजपर्यंत एकही घटना घडली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, सरकारच्या जीआरमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी निश्चित दिवस देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे म्हणणे काय?
मुंबई महापालिकेच्या वतीने अॅड. मिलिंद साठे यांनी बाजू मांडली. शिवसेनेच्या दोन्ही बाजूंमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे ते म्हणाले. तसेच, होर्डिंग्ज लावण्यावरून दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे. गणपती उत्सवातही शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झाली होती आणि हा तणाव अजूनही कायम असल्याचे ते म्हणाले. मिलिंद साठे म्हणाले की, ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती पोलिसांनी मुंबई महापालिकेला दिली असून शिवाजी पार्क हे संवेदनशील ठिकाण आहे.
