तीन हजार कोटी रुपये मूल्यांच्या प्रकल्पाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, दि. २२ : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम,येथे आंध्र प्रदेशचे रस्ते आणि बांधकाम मंत्री दादीसेट्टी रामलिंगेश्वर राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन हजार कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली.

यावेळी झालेल्या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते काकीनाडा किनारपट्टी आर्थिक क्षेत्र (सेझ), सेझ पोर्ट, मासेमारीसाठी बंदर (फिशिंग हार्बर) आणि काकीनाडा अँकरेज पोर्ट यांची हरीत क्षेत्र रस्ते जोडणी (ग्रीन फील्ड रोड कनेक्टिव्हिटी) होईल, ज्यामुळे काकीनाडा बंदरातून तांदूळ, मासे, तेल जेवण, लोह-खनिज, जैव-इंधन, ग्रॅनाइट यांची निर्यात सुरळीतपणे होऊ शकेल.

या रस्ते प्रकल्पांत कैकाराम, मोरामपुडी, उंडाराजावरम, तेताली आणि जोन्नाडा येथील पाच उड्डाणपुलांचे बांधकाम समाविष्ट आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर, अनेक ठिकाणांहून सहजपणे आणि सुरक्षितपणे वाहतूकीची व्यवस्था होईल, असेही गडकरी यावेळी पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाअंतर्गत आंध्रप्रदेशला समृद्ध करण्यासाठी तेथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, तसेच वरील प्रकल्पांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
