देशवासीयांसह राजकीय नेत्यांनीही साजरा केला रक्षाबंधनाचा सण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री कार्यालयात काम करणारे सफाई कर्मचारी, शिपाई, माळी आणि वाहनचालकांच्या मुलींकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना विधानभवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या.
नाशिकमध्ये नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीनं पोलिसांना, तर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सातपूर इथल्या शाळेतल्या मुलींनी, तसंच डे केअर स्कूलमधल्या विद्यार्थिनींनी लष्करी जवानांना राख्या बांधल्या. अमरावती जिल्ह्यात वाठोडा शुक्लेश्वर इथं मुलींनी मुलींना राख्या बांधून, बहिणीच्या रक्षणासाठी फक्त भाऊच नाही तर बहीणही सक्षम असल्याचा संदेश दिला.
कोल्हापुरात बालकल्याण संकुल या अनाथ मुलांच्या संस्थेत अनेक सामाजिक संस्था, आणि शालेय विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरं करुन नवं नातं जोडलं. अंधशाळेतही विविध शाळा, महाविद्यालयंच्या विद्यार्थीनींनी लहानग्या भावंडांना राखी बांधली. कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी आणि युवतीसेनेच्या वतीनं आधार रुग्णालयाचे वार्ड बॉय, सेवा देणारे अधिकारी, आयसोलेशन हॉस्पिटलचे सेवा देणारे कर्मचारी, तसंच पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. अनेक महिला संस्थांनी कळंबा कारागृहातल्या बंदीजनांना राखी बांधली.
