‘या’ जिल्ह्यात सापडला राज्यातील दुसरा ‘झिका’ रुग्ण
पालघर जिल्ह्यात राज्यातला दुसरा झिका रुग्ण सापडला आहे. तलासरी तालुक्यात झाई इथल्या आश्रमशाळेतल्या एका मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचं पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर पालघरमधे सर्वेक्षण, किटक व्यवस्थापन, उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा उपाय योजना केल्या जात आहेत. सध्या राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे, या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्वेक्षण अधिक जोमानं केलं जात आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात आठवडापासून कॉलराचा उद्रेक सुरु आहे. आतापर्यंत कॉलराचे १८१ रुग्ण आढळले. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. उद्रेक बाधित गावांमधे वैद्यकीय पथकं चोवीस तास कार्यरत असून, पाणी गुणवत्ता सनियंत्रण, रुग्ण सर्वेक्षण उपचारासाठी आवश्यक व्यवस्था, लोकशिक्षण इत्यादी उपाय योजनांद्वारे आजाराला आळा घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.
