“राज्यातल्या सध्याच्या राजकीय हालचालींशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. २४ : राज्यातल्या सध्याच्या राजकीय हालचालींशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही मात्र तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करु असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
आपण कोणाच्याही संपर्कात नसून, राज्यातल्या घडामोडींविषयी आपल्याला दूरचित्रवाहिन्यांवरुनच माहिती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत पत्रकारांना छेडलं असता आपल्याला काहीही माहित नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मोहित कांबोज हे एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्यानं त्यांच्यासोबत असतील, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला तर पक्षाची १३ जणांची कार्यकारिणी आहे, त्यापुढे चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल, असं पाटील म्हणाले.
Source – AIR
