Fighter Jet
पाकिस्तानच्या एफ-16 विमानाचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न, वायुसेनेने लावले पळवून
नवी दिल्ली: भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारताचा बदला घेण्यासाठी वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर येर-जाऱ्या घालत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (१ एप्रिल) पहाटे ३ वाजता पाकिस्तानने पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये चार एफ-16 लढाऊ विमानं घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु अलर्ट असलेल्या भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी विमानांना पाकिस्तानात हुसकावून लावले आहे.
पंजाब सीमेजवळ भारताच्या हद्दीत चार पाकिस्तानी एफ-16 विमानं आणि एक मोठ्या आकाराचा यूएव्ही पाहिला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतले. भारतीय लढाऊ विमाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं माघारी फिरली. सुखोई विमाने आणि मिराज विमानांच्या मदतीने पाकिस्तानची विमाने पिटाळून लावण्यात भारताला यश आले आहे.
पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहे. त्यानंतर भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी पाकिस्तानने सोडलेली नाही. मात्र भारताकडून पाकिस्तानच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिले जाते आहे. आता पहाटे तीनच्या सुमारास आलेली लढाऊ विमानेही भारताने हूसकावून लावली आहेत.
