सोबत काही मंत्रीही सोडणार शिवसेना?
मुंबई/सुरत,दि.२१: काल जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील निकलांनंतर महाविकास आघाडी ला धक्काच बसला होता. परंतू, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व काही सेना आमदार अचानक नॉट रीचेबल झाल्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्याच मतभेद असल्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांत चर्चा चालू होत्या. परंतू, शिंदे यांच्या कृतीने यावर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळत आहे.
असे मानले जाते की काल रात्रीच एकनाथ शिंदे हे सुरत येथील मेरिडियन हॉटेल येथे पोहोचले असून त्यांच्यासोबत जवळपास सेनेचे २५ आमदार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात असल्याचे मानले जातेय. शिवसेनेच्या वतीने सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात आहे. सेनेकडूनही एकनाथ शिंदे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यात अद्याप त्यांना यश आलेले नाही. थोड्याच वेळात शिवसेना आमदारांची बैठक नियोजित असून याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. असेही वृत्त आहे की एकनाथ शिंदेही थेट गुजरात येथे पत्रकार परिषद घेत राजकीय बॉम्ब फोडण्याची शक्यता आहे. याच वेळी नेमके किती आमदार शिंदे यांच्या सोबत आहेत हे स्पष्ट होईल. एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीत पुढीलप्रमाणे काही आमदार असल्याचे मानले जाते.
नॉट रिचेबल आमदार :
- साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
- सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
- उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
- पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
- बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
- मेहकरचे आमदार संजय गायकवाड
- बाळापूरचे आमदार नितीन देशमुख
- सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
- पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
- औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
- कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
- वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
- भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
- महाडचे भरत गोगावले
