योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहिरी पोवाडा सादर
कोल्हापूर, दि. २० : आंतरराष्ट्रीय योग दिन एका दिवसावर येऊन ठेपला असताना कोल्हापूरमध्ये कळंबा येथे केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि कळंबा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने योगावर आधारित कार्यशाळा आणि योग आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. योगाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी शाहिरी पोवाडा कला मंच कोल्हापूर, यांनी प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण केले.
यावेळी गार्गी भट या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने नेत्रदीपक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी योग आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली, जिचे सूत्रसंचालन आणि परीक्षण योगतज्ञ रवी कुमठेकर यांनी केले.
उद्या २१ जून रोजी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कॉमन योग प्रोटोकॉलवर आधारित योग प्रात्यक्षिके करण्यात येतील व नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत झालेल्या तालुकास्तरीय योग प्रात्यक्षिक आधारित स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येईल.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सर्व शाळांना आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाभ्यास करण्याविषयी देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर, यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, कळंब्याचे सरपंच सागर भोगम, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी केर्ले, एकात्मिक बाल विकास योजनेच्या पर्यवेक्षिका नाजनीन मुल्ला, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
