उरण तालुक्यातील स्व. रमेश. का. डाऊर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे पत्रकारांचा सत्कार
उरण, दि.६: मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार दिनानिमित्त स्व. रमेश. का. डाऊर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे रमेश रेसिडेन्सी चारफाटा उरण येथे उरण तालुक्यातील पत्रकारांचा सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प व लॅपटॉप बॅग देऊन पत्रकारांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक वादळवाराचे संस्थापक तथा आदर्श शिक्षक दा. चा. कडू गुरुजी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, डॉ. सत्या ठाकरे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनी केले. प्रास्तविकात प्रदीप पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्वर्गीय रमेश डाऊर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी रमेश डाऊर यांचे सुपुत्र सचिन डाऊर यांचेही सामाजिक कार्य उल्लेखनीय असून वडिलांचा वारसा सचिन डाऊर यांनी पुढे चालविला असल्याचे सांगत सचिन डाऊर यांनी स्थापन केलेल्या रमेश. का. डाऊर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाच्या पाठीमागील उद्देश सांगितला. समाजात पत्रकारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. अनेक सेवा सुविधांपासून पत्रकार वंचित आहेत. रात्रंदिवस समाजासाठी झटणाऱ्या, निस्वार्थी वृत्तीने जनतेसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्याच्या दृष्टीकोनातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिन डाऊर यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, दिलीप कडू, संजय गायकवाड, अजित पाटील, घनश्याम कडू, अनंत नारंगीकर, विरेश मोडखरकर, दिनेश पवार, आशिष पाटील, पूजा चव्हाण, विठ्ठल ममताबादे, सुयोग गायकवाड, फोटोग्राफर विशाल गाडे आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणात दा. चा. कडू गुरुजी यांनी आपल्या जीवनातील संघर्ष सर्वांसमोर मांडला. पत्रकारिता करताना खूप संघर्ष करावा लागतो. सुरवातीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता यात खूप मोठे बदल झाले आहेत. तेव्हा प्रामाणिकपणे सचोटीने काम करण्याची, आपली विश्वासहर्तता जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करत सर्व पत्रकारांनी, पत्रकार संघटनानी आपापसातील मतभेद विसरून एकत्र या असे आवाहन दा. चा. कडू गुरुजी यांनी पत्रकार दिना निमित्त केले. यावेळी आभार प्रदर्शन पत्रकार प्रदीप पाटील यांनी केले. एवढ्या उत्तमरीतीने उरण मध्ये पहिल्यांदाच पत्रकारांचा सत्कार केल्याने सर्व उपस्थित पत्रकारांनी स्व. रमेश डाऊर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन डाऊर व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.
